अस्मितादर्श

अस्मितादर्शने विगत ५० वर्षांपासून मराठी साहित्य सृष्टी व एकूणच भारतीय विचारसृष्टीला ऊर्जा प्राप्त करून दिली, अक्षर शत्रू ठरविलेल्या समूहांमधून शेकडो कवी, लेखकांना लिहिते केले. त्यांचे साहित्य आंतरिक निष्ठेने प्रकाशित केले. अस्मितादर्श चे हे कार्य मराठी नियतकालिकांच्या इतिहासात अद्वितीय आहे. संस्कृतीनिर्माणाचे हे कार्य अखंडपणे करताना अस्मितादर्शने प्रांजळ व प्रखर बुद्धिवादी भूमिका घेतली. सर्व समतावादी आणि परिवर्तननिष्ठ विचारवृत्तीच्या लेखकांना अस्मितादर्श मध्ये व्यक्त व्हावेसे वाटले. थोरांच्या सदभाव आणि नवोदितांच्या उत्कटता यामुळे अस्मितादर्श मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांना स्वकीय वाटले. १९६८ पासून ५० वर्ष अविश्रांतपणे डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्शचे साक्षेपी संपादन केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचे योगदान भूषणावह आहे. आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या संज्ञापणात समर्पणशीलतेचा आदर्श अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांनी उभा केला आहे.
'अस्मितादर्श ' अंकाचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क:
प्रागतिक विचार संसदेचे 'अस्मितादर्श'
श्रावस्ती, मिलिंद महाविद्यालयासमोर, छावणी,
औरंगाबाद – ४३१००२
अस्मितादर्श साहित्य संमेलन

१९७४ पासून सातत्याने आयोजित झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनातून चळवळीच्या साहित्याचे दिशादर्शन झाले. अस्मितादर्श साहित्य संमेलने म्हणजे सांस्कृतिक परिवर्तनाच्या कार्यशाळा ठरल्या. आतापर्यंत ३५ अस्मितादर्श साहित्य संमेलने संपन्न झाली. अनेक नवलेखकांना प्रस्थापित साहित्यीक व विद्वानांसमक्ष आपले विचार व प्रतिमा अभिव्यक्त करण्याची संधी या संमेलनांमुळे प्राप्त झाली. तत्वचर्चा व तत्वबोधाचे सम्यक संस्कार या संमेलनांमधून महाराष्ट्राला प्राप्त होत राहिले व आहेत. अनेक श्रेष्ठ कृतीशील विचारवंतांनी आपले जीवनभाष्य व साहित्यभाष्य या संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांमधून व्यक्त केले.